मानवी जीवन:-
मानवी जीवन:-
मानवी जीवन हे अनेक चढउतारांनी भरलेले आहे. जन्मापासून सातत्याने माणूस नवनवीन गोष्टी शिकत असतो. नवीन शिकण्याची इच्छा ज्याच्या जवळ आहे तो यशस्वी जीवन जगू शकतो. या पृथ्वीतलावर करोडो माणसे वावरत आहेत . पण भविष्याचा वेध घेऊन, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नव्या उमेदीने उच्च ध्येय उराशी बाळगून जे काम करतात तेच जीवनात खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. सातत्याने प्रयत्न, कष्ट व सकारात्मक विचार मानवाला सुख- समाधान- यश- आनंद व चांगले आरोग्य मिळवून देत असतो. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यक्तिपरत्वे वेगवेगळा असू शकतो. *'जशी दृष्टी तशी सृष्टी'* याचा विचार केल्यास जसे आपण एखाद्या घटनेकडे पाहतो तशा पद्धतीनेच ते दृश्य आपल्याला दिसत असते. संकटे ही येतच असतात. पण संकटाकडे संधीच्या दृष्टीने पाहिल्यास आपल्याला त्या संकटावर मात करता येते. सुख आणि दुःख या मानवी जीवनातील दोन बाजू आहेत. दोन मित्र समोरासमोर बसलेले आहेत. दोघांच्याही समोर दोन पेले थंड पेयाने अर्धे -अर्धे भरलेले आहेत . एक मित्र अर्धा पेल्याकडे आनंदाने पाहतो तर दुसरा मित्र मला अर्धाच पेला मिळाला म्हणून दुःख व्यक्त करतो. म्हणजे दुःख हे माणसाच्या समाधानावर अवलंबून आहे. कुठे थांबायचे हे सुद्धा प्रत्येकाने ठरवले पाहिजे. जन्मापासून सुरू झालेला मानवाचा प्रवास कधी ना कधी थांबणार असतो. म्हणून केवळ मोहाच्या पाठीमागे न लागता परोपकारी वृत्तीने दुसऱ्याला मदत करण्याची भावना ठेवल्यास खरे समाधान आपल्याला मिळत असते. सत्ता- संपत्ती- पैसा ह्या क्षणिक आहेत. त्या येतात व जातात. पण समाधान हे आपण त्या गोष्टीकडे कसे पाहतो याच्यावर अवलंबून असते. मानले तर सुख नाही तर दुःख. म्हणूनच म्हणावेसे वाटते की, मानवी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे.


Comments
Post a Comment